मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. त्यानंतर भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सरकारही स्थापन केलं. तर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यातच आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला होता. त्या टीकेला शरद पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ‘हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही,’ असं पवारांनी म्हंटल आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काल 25 वा वर्धापन दिन झाला. त्यानिमित्तानं पक्षातील दोन गटांचे दोन स्वतंत्र कार्यक्रम झाले. अजित पवार गटाचा मुंबईमध्ये मेळावा झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा मेळावा हा अहमदनगरमध्ये झाला. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.
आज मोदी गॅरंटी आज राहिलेली नाही, मोदी सरकार राहिले नाही. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यत तीन महिन्यानी निवडणूक आहे तिथे आपल्याला सरकार आणायचे आहे, जनतेत विश्वास निर्माण करायचा आहे. पंतप्रधान एका पक्षाचा नसतो देशाचा असतो, सर्व जाती, धर्म याचा विचार करायला पाहिजे.. ते विसरले नाही त्यांची विचारधारणा होती, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतात पण त्याला मर्यादा हव्या. माझ्याबद्दल ते भटकती आत्मा बोलले. हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. नकली बापाची शिवसेना म्हणायचे हे त्यांना शोभते का? पंतप्रधानांनी हे बोलावं का? असा प्रश्न विचारत त्यांना तारतम्य राहिलं नाही, असं पवारांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. ‘मी तुम्हाला खात्री देतो आमचे खासदार जनतेसाठी लढतील, असं पवारांनी सांगितलं. हे आठही सदस्य म्हणजे अष्टप्रधान मंडळ असल्याचं पवार यावेळी म्हणाले.