सातारा (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारी करत असल्याचं पहायला मिळत आहे. सातारा- जावळीतील महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
उदयनराजे भोसले काय म्हणाले..?
उदयनराजे भोसले म्हणाले, मागील वेळी शिवेंद्रसिंहराजेंचे मताधिक्य कमी झाले, यावेळी त्यांना आम्ही राज्यात 1 नंबरच्या लीडने निवडून आणणार असं सांगत असतानाच पुन्हा महायुती राज्यात सत्तेत येईल, असे ठाम प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. खासदार शरद पवारांनी त्यांच्या काळात कामे केली नसल्याने सध्या त्यांचे पश्चिम महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या भवितव्याकडे दुर्लक्ष केले असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.
उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, “कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रकल्प पवारांच्या काळात राबविले गेले नाहीत. त्याकाळी पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला असे सांगणारे पवारच होते. मग, त्यावेळी त्यांनी विविध महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प का मार्गी लावले नाहीत? भाजपच्या काळात मी स्वतः गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून योजना, प्रकल्प मार्गी लावले.” असल्याचंही उदयनराजे भोसले म्हणाले.
ज्यावेळी शरद पवार यांच्या हातात मराठा समाजाचे भवितव्य होते. त्या वेळी त्यांनी काही केले नाही. 23 मार्च 1994 च्या नोटिफिकेशनवर का कोणीच बोलत नाही? जरांगे पाटील यांना मी त्यावेळेस सांगितले होते. तुम्ही बसून चर्चेतून प्रश्न सोडवा. सध्या सगळे हे राजकीय झालं आहे. प्रत्येक गोष्ट राजकीयच करणार असाल तर त्याला काहीही अर्थ उरणार नाही. सातारा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार म्हणजे आम्ही दोघांनी महायुतीच्या माध्यमातून केलेली कामे घेऊन जनतेत जाणार असल्याचंही उदयनराजे भोसले यांनी सांगितले.