मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं, तर फक्त 10 आमदार निवडून आल्यानं शरद पवार आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र, त्यानंतर या सर्व घडामोडी घडून गेल्यानंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवार यांची भेट घेत घेतली आहे. शरद पवार यांचा काल वाढदिवस होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार हे सहपरिवार गेले होते. या नंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. अशातच उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. आता यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत..?

संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांसोबत जाणे आणि भाजपासोबत जाणे हे एकच आहे. मी शरद पवार साहेबांना ओळखतो. त्यांच्याबरोबर जवळपास मी रोजच असतो. राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा आजूबाजूलाच आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आम्ही या महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील, असे मला वाटत नाही. भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नौशे गौशे घाबरून पळून गेलेले आहेत. त्यांच्या नादाला लागून ते काही वेगळा विचार करतील असे वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.