बारामती – अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. आता स्वत: शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीमधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजित पवार यांची नक्कल केल्यानंतर शरद पवार यांनी या सगळ्यावर आपली भूमिका मांडली. ‘हा प्रश्न भावनेचा नाही. हा मुद्दा तत्त्वाचा आणि विचारांचा आहे. आम्ही गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेतले आहे. मी याच विचारांनी काम करतो. गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण, ज्योतीराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या सर्वांची विचारधारा ही माझी विचारधारा आहे. या विचारधारेसाठी मी काम करणार. हीच माझी पद्धत आहे, सत्ता नाही म्हणून सहकाऱ्यांनी आमचा साथ सोडली. आमच्या काही लोकांनी उद्योग केला आणि पहाटे शपथ घेतली, राज्यपाल यांना उठवले कशासाठी? चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का? घर मोडणे माझा स्वभाव नाही. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.