मुंबई : शरद पवारांनी मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मध्यस्थी करावी अशी मागणी होत असताना शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार यांची भेट घेण्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. शरद पवार यांची भेट झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा या आंदोलकांनी दिला होता. अखेर मराठा समाजाचे आंदोलक आणि शरद पवार यांच्यात चर्चा पार पडली. यानंतर शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. दोघांमध्ये सामंजस्य कसं करता येईल यावर अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांचा दोन दिवसीय दौरा शुक्रवारपासून सुरू झाला. या दौऱ्यादरम्यान मराठा समाजाच्या आंदोलकांनी शरद पवारांची भेट घेण्याचा आग्रह धरला होता. अखेर मराठा समाजाचे आंदोलक आणि शरद पवार यांच्यात रामा हॉटेलमध्ये बैठक झाली. बंद दाराआड ही चर्चा झाली असून शरद पवार यांनी आंदोलकांचे म्हणणे या बैठकीत ऐकून घेतले. या बैठकीनंतर शरद पवार यांनी परतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. तिथे कटुता, अवविश्वासाचं चित्र दिसतंय आणि हे भयावह आहे. मी महाराष्ट्रात कधीही असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे. यासाठी मुळात संवाद ठेवायला पाहिजे. पण आज संवाद संपलेला आहे. सार्वजनिक जीवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं,” असं शरद पवार म्हणाले.

“दुर्दैवाने आता दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे. तर एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने प्रकरणात अजिबत लक्ष घातलेलं नाही,” असेही शरद पवार म्हणाले.

मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया
तर शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेनंतर माहिती देताना मराठा समाजाच्या आंदोलकांनी म्हटले की, या बैठकीमध्ये बोलताना शरद पवार यांनी, सर्वांनी मिळून तोडगा काढला पाहिजे असं म्हणाले. सरकारने ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही तयार आहोत, असे शरद पवार म्हणाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सरकार, विरोधक ,जरांगे पाटील आणि ओबीसी यांच्यात चर्चा झाली पाहिजे. ही चर्चा लाईव्ह झाली पाहिजे असे पवारांनी म्हटल्याचा दावा चर्चेसाठी आलेल्या मराठा आंदोलकांनी केला आहे.