सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या कमी मतदानावरून पालकमंत्री शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे शनिवारी आयोजित केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मोठं वक्तव्य केलंय. यावेळी शंभूराज देसाई यांनी मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे म्हंटले आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून महायुतीचे उदयनराजे उभे नसून शंभूराज देसाई उभे आहेत, असे समजून शिवसेना आणि देसाई समर्थकांनी मोठं मताधिक्य देऊन विजयी करावं, असा प्रचार मी केला होता. पण माझ्या मतदार संघातून मताधिक्य मिळालं नाही. यावर मी कुणालाही दोष देणार नाही. इथला आमदार म्हणून मी एकटा त्याला जबाबदार आहे, असे साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले विजयी झाले. असे असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे माझाच पराभव झाला आहे. मंत्रिपदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता गेली. त्यांना सुस्ती आली‌‌. त्यामुळे घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे.”

कार्यकर्त्यांना सत्ता टिकवता आली नाही
पुढे शंभूराज म्हणाले, “उदयनराजे भोसले यांचं पाटण तालुक्यातून मताधिक्य घटल्याचं मलाही शल्य आहे. उदयनराजे या निवडणुकीत विजयी झाले असले तरी शंभूराज देसाईंचा पराभव झाला आहे. मी खुर्चीला चिटकून बसणारा कार्यकर्ता नाही. तालुक्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या हितासाठी सत्ता मिळवली. ती सत्ता कार्यकर्त्याना टिकवता आली नाही. यापुढील काळात मी संघटनेसाठी काम करणार आहे,” असे त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.

मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ करू शकलो नाही
“लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती करणआर आहे. मी आमदार म्हणून संघटनेसाठी काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास होता. मात्र तो सार्थ करू शकलो नाही,” अशी खंत शंभूराज देसाईंनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवली.