मुंबई (प्रतिनिधी) : शाहरूख खान आणि गौरी खानचा मन्नत बंगला सध्या जोरदार चर्चेत आला आहे. शाहरूख खानला त्याच्या मन्नत बंगला आणखीनच आलीशान आणि सुंदर बनवायचा असल्याची माहिती समोर येत आहे.
शाहरूख खानची पत्नी गौरी खान हिने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे गेल्या महिन्यातच एक अर्ज दिला होता. ज्यामध्ये मन्नत बंगल्याचे आणखी काही मजले वाढवण्याची परवानगी तिने मागितली होती. गौरी खानच्या अर्जात ‘मन्नत’च्या वर म्हणजे सातव्या आणि आठव्या मजल्यावर आणखी दोन मजले बांधण्याची परवानगी तिने मागितली असल्याचं नमूद केलं आहे.
10 आणि 11 डिसेंबर रोजी झालेल्या निवेदनावर बैठकीत चर्चा झाली आणि त्यात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने गौरी खानचा हा अर्ज समाविष्ट केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खान कुटुंबाला हे दोन नवीन मजले कोणत्या उद्देशाने वापरायचे आहेत हे या अर्जात नमूद केलेले नाही. हे दोन मजले बनवण्यासाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या आलिशान बंगल्याचे 6 मजले आहेत. मात्र, आता शाहरूख खानला सातवा आणि आठवा मजला बांधायचा असल्यानं आता मन्नत आणखीनच सुंदर आणि आलिशान होऊ शकतो.