शिरोळ ( प्रतिनिधी ) : राज्य आणि केंद्र शासनाबरोबरच साखर कारखानदार शेतकरीविरोधी धोरण अवलंबत असून ऊस उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा गरजवंत ऊस उत्पादक संघटना आणि आंदोलन अंकुश यांच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालयावर ऊस उत्पादक शेतकऱ्याचा एल्गार मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी चौकातून निघालेल्या या मोर्चात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी म्हणाले, साखर कारखानदार संगनमताने शेतकऱ्यांना लुटत आहेत. जाहीर केलेला ३४०० रुपयांचा दर आम्हाला मान्य नाही. साखरेचे आणि उपपदार्थांचे भाव चांगले असताना शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळणे अपेक्षित आहे. गेल्या हंगामातील ऊसाला २०० रुपयांचा दुसरा हप्ता आणि यावर्षी गाळपास येणाऱ्या ऊसाचा दर जाहीर झाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, कारखानदार दंडूकशाहीने कारखाने सुरू करत आहेत. शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळालाच पाहिजे. तोपर्यंत ऊस तोड करू नये. माजी आमदार उल्हास पाटील, “जर योग्य दर ठरला नाही, तर आम्ही शिवाजी चौकात ठिय्या मांडून बसू”, असे वक्तव्य केले.

शेतकऱ्यांच्यावतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले. त्यांनी मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, युवा गरजवंत ऊस उत्पादक संघटनेचे यशवंत देसाई, आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह शिरोळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.