मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील शाळा पुन्हा उघडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंदे ठेवण्यात आली आहेत. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे. नववी ते बारावीचे विद्यार्थी वयाने थोडे मोठे असतात. त्यामुळे हे पहिले पाऊल आपण उचलत आहोत. सर्व माहिती घेऊनच आपण शाळा सुरु करू. अधिवेशनात जशा आमदारांच्या तपासण्या केल्या गेल्या, तशा विद्यार्थ्यांच्या करता येतील का, याबाबत चाचपणी सुरू आहे. बाधित शिक्षक शाळेत जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. धोरण ठरवून नोव्हेंबरपासून शाळा सुरु करु.