मुंबई : पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर बरबटलेल्या व्यवस्थेचा नवनवा चेहरा दिवसागणिक उघड होत आहे. आरोपीच्या सुरक्षित सुटकेसाठी कोणी आणि कसे प्रयत्न केले हे आता उघड होऊ लागले आहे. त्याबरोबरच आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे. मात्र या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी ज्या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली, त्या पथकाच्या अध्यक्षावरच यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचं आता समोर आलं आहे. तसेच एसआयटी चौकशी समिती नियुक्तीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे.

पोर्शे कार आपघटतील अल्पयीन आरोपी वेदांत अग्रवालच्या ब्लड सॅम्पल प्रकरणी ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावर राज्य सरकारने एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र आता ही चौकशी समितीच वादात अडकली आहे.

डॉ. पल्लवी सापळे पुण्यात दाखल
ससून हॉस्पिटल ब्लड सॅम्पल प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी जे. जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच डॉ. गजानन चौहान आणि डॉ. चौधरी या समितीचे सदस्य आहेत. डॉ. पल्लवी सापळे या पुण्यात दाखल झाल्या आहेत. ब्लड सॅम्पल प्रकरणी नेमके काय झाले, त्या घटनाक्रमाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांची नियुक्ती वादात सापडली आहे.

डॉ. पल्लवी सापळेंच्या नियुक्तीवर अंबादास दानवेंचा आक्षेप
ससून रूग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या डॉ.पल्लवी सापळेंच्या नेतृत्वाखालच्या समितीवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. डॉ. सापळे यांची जेजे रुग्णालयातील सामान खरेदी-विक्री प्रकरणात चौकशी सुरु आहे. अशात त्यांना चौकशी करायला देणं आम्हाला मंजूर नाही, असं ट्वीट अंबादास दानवेंनी केलं आहे.

अंबादास दानवे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचे अध्यक्षपद जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे दिले. मुळात डॉ. सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी, यंत्रसामुग्री खरेदीच्या कागदावर सही करत नाहीत, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वी केला होता. यावर चौकशी समिती नेमण्याचे सरकारने विधानसभेत घोषणाही केली होती. ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणे म्हणजे सरकारच्या हेतू वर शंका आणणारे आहे? ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही.. चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी.

डॉ.पल्लवी सापळेंची नियुक्ती वादात
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोन जणांना चिरडलं.अल्पवयीन आरोपीच्या वडीलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे पुरवले. या प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकारासाठी एसआयटी समिती गठीत करण्यात आली आहे. या एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. दरम्यान, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या नियुक्तीत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे.

नियुक्ती करण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप नाही: हसन मुश्रीफ
डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती ही वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या मार्फत होते. डॉ. पल्लवी सापळे यांची पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एबीपी माझा’ला माहिती दिली आहे. आयुक्तांकडून सेवा ज्येष्ठतेनुसार पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून पल्लवी सापळे यांना तत्काळ चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच तत्काळ योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांवरील कारवाई तांत्रिक कारणस्तव अडकू नये यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून एसआयटीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

सापळे यांच्यावर काय आहेत आरोप?
डॉ. पल्लवी सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय 13 लाख रुपये जमा केले. या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईने दान दिल्याचं सांगितलं, असा आरोप डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर करण्यात आला आहे. तसंच त्या वापरत असलेल्या वाहनाच्या बिलाबाबत बनवाबनवी केल्याचे आरोप आहेत. डॉ. सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता. जेजे रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, असेही त्या म्हणाल्या होत्या.
डॉ. सापळे यांच्यावर केलेले आरोप

  • डॉ. सापळे भाड्याची गाडी वापरत असून त्याचे महिन्याला एक लाख रुपयांचे बिल शासनाला सादर करतात. हा खर्च 70 ते 80 लाख रुपयांवर गेला आहे.
  • मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय 13 लाख रुपये जमा केले आणि त्यातून ॲम्ब्युलन्स खरेदी करून ती आईने दान दिल्याचे सांगितले.
  • ऑगस्ट 2022 मध्ये सहसंचालक पदावर पदोन्नती आणि संभाजीनगर येथे बदली झाली आहे. मात्र अजूनही त्यांच्या बदलीचे आदेश निघालेले नाहीत.