मुंबई – लोकसभा निवडणुकींनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वार वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष नेते विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आपल्या प्रचाराचा श्री गणेशा केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील प्रभादेवीच्या सिध्दिविनायक बाप्पाच्या दर्शनाने विधानसभा प्रचाराचा श्री गणेशा केला आहे. आता यावर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत..?
संजय राऊत म्हणाले, जे सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत. ती चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायकाला पाप पुण्य समजतं. पुण्य कोण करतंय आणि पाप कोण करतंय या सर्व गोष्टी समजतात. चोऱ्या लबाड्या कोण करतंय, कोण माझ्या दारात पुण्यात्म व्हायला येतेय, हे देखील सिद्धिविनायकाला कळतं’, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. पुढे संजय राऊत असेही म्हणाले, ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलं आहे. सिद्धिविनायक अशाप्रकारे कोणालाही आशीर्वाद देत नाही, असेही म्हणाले आता राऊतांच्या या टीकेवर महायुतीचे हे नेते लय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.
अजित पवारांचं सिद्धिविनायकाकडे साकडं
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील सर्व आमदार आणि मंत्रीही उपस्थित होते. अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील यांसह सर्व महत्त्वाच्या नेते मंडळींच्या उपस्थित आगामी विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाप्पाला साकडं घातलं. ‘आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात देवदर्शन करुन करतो. आम्ही आता जनतेच्या समोर जाणार आहोत, त्यासाठी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावे, सिद्धिविनायकाने आशीर्वाद द्यावे हेच साकडं सिद्धिविनायकाला घातले’, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर दिली. तर आम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शनाने प्रचाराचा श्रीगणेशा केलेला आहे. असे ही ते म्हणाले…