मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. विधानसभेच्या निवडणूका 20 नोव्हेंबरला होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. प्रचारादरम्यान सत्ताधारी नेते आणि विरोधक नेत्यांमध्ये वार प्रतीवार पाहायला मिळत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत..?

संजय राऊत म्हणाले, “शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाच हेडक्वार्टर गुजरातला आहे. त्यांनी तिथे जाऊन राजकारण करावं. महाराष्ट्रात मराठी माणसाच राजकारण करु नये” असं संजय राऊत म्हणाले. वांद्रे पूर्वमधून मनसेने तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे, त्यावर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केलं. “महाराष्ट्रात काही पक्ष आहेत, त्यांचं मुख्य खाद्य सुपारी आहे. ते सुपारीवर जगणारे पक्ष आहेत. मुंगी साखर खाते, झुरळ वेगळं काहीतरी खातं, वाघ अजून कायतरी खातो. राजकारणात असे काही पक्ष आहेत, त्यांचं मुख्य अन्न सुपारी आहे. आता सुपारीवर जगणाऱ्या लोकांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्राच्या शत्रुंशी हातमिळवणी केली असेल, तर ते या राज्याच दुर्देव आहे” अशी टीका संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली आहे.