कोल्हापूर ( प्रतिनिधी ) स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या विशाळगडावर गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अनधिकृत बांधकाम, धर्मांधता, अस्वच्छता, पार्ट्या, अवैध धंदे, दुर्गंधीचे साम्राज्य, आणि कचऱ्याचे ढिग यांमुळे गडाचे गडपण हरवले आहे. राज्य पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असलेल्या विशाळगडावर बेजबाबदार प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यास कारणीभूत आहे. असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगड मुक्ती संदर्भात हालचाली आता वेगाने सुरु केल्या आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडीयावर माहिती देताना म्हटलं आहे की, विशाळगड मुक्ती संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी 5 डिसेंबर 2022 रोजी मी स्वतः असंख्य शिवभक्तांसह विशाळगडावर जाऊन सद्यस्थितीची पाहणी केली होती. याबाबत 7 डिसेंबर 2022 रोजी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावत याची माहिती दिली होती. यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी, दुर्गप्रेमी व विशाळगडचे रहिवासी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पुढील तीन महिन्यात गडावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याची ग्वाही देखील जिल्हा प्रशासनाने दिली होती.

दरम्यान गडावर पशूपक्षी हत्याबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी शे-पाचशे मतांसाठी या कामांमध्ये अडथळे आणल्यामुळे व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे ही मोहीम अर्ध्यातच बंद पडली व अलीकडच्या काळात गडावर धर्मांधता व अतिक्रमणे परत जोर धरू लागल्या आहेत. त्यामुळे यावर आता निर्णय होणे आवश्यक आहे. परिणामी हा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आला असून विशाळगड मुक्ती संदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी 7 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे बैठकीचं आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी संस्था व शिवभक्तांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन देखील करण्यात आलं आहे.