कडगाव ( प्रतिनिधी ) : काँग्रेसचे निष्ठावंत नेते ,माजी आमदार दिनकर जाधव यांचे 95 व्या वर्षी दुःखद निधन झाले. काँग्रेसचे निष्ठावंत, अजातशत्रू व्यक्तिमत्व, हसतमुख नेते व जुन्या काळातील साधा सरळ आमदार म्हणून दिनकरराव जाधव यांची ख्याती होती. राजकीय क्षेत्रात संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या दिनकर जाधव यांचा जन्म 1931 मध्ये तिरवडे येथील जाधव सरकार घराण्यात झाला. ते शेवटपर्यंत सरकारदादा म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते.
त्यांनी निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करताना प्रथम कडगाव तिरवडे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम पाहिले. पुढे 1962 ते 1975 तिरवडे गावचे सरपंच, 1959 पासून सेवा संस्था तिरवडे चे चेअरमन, सन 1963 ते 66 भुदरगड तालुका सहकारी संघाचे संचालक, 1965 ते 68 कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, 1967 ते 1978 कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य, 1975 ते ७८ पंचायत समिती भुदरगड चे सभापती, 1978 ला विधानसभा सदस्य व 1982 ला विधानपरिषद सदस्य अशा दोन टर्मला आमदारकी मिळवली व त्यानंतर 1984 पासून सलग पंधरा वर्षे बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिले. सरपंच ते आमदार अशा सर्वच जबाबदारीच्या पदावर असताना त्यांनी लोकाभिमुख कारभार करीत सर्व घटकांना समान न्याय देण्याचे कार्य केले. साधा सरळ माणूस, हसतमुख राजकारणी अशा भूमिकेतून त्यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, शोषित, वंचित अशा सर्वच घटकांना आपलेसे केले. लोकशाही पुरोगामी नेतृत्वाचे, आदर्श विचारांचे जाण आणि भान त्यांनी सदैव ठेवले. सहकारी संस्था, बँक, साखर कारखाना यांच्या माध्यमातून ग्रामीण विकास व कृषी उद्योगातून ग्रामीण भागात कायापालट करण्याचे श्रेय दिनकरराव जाधव यांनाच जाते.