टोप/प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील कुशाजी मळा परिसरातील नानासो माने यांच्या 40 ते 50 फूट खोल असलेल्या विहिरीत गुरुवारी रात्री कोल्हा पडला होता. पण वन विभागाच्या मदतीने या कोल्ह्याला जीवदान मिळाले आहे.

दरम्यान, भादोले येथील कुशाजी मळा परिसरातील नानासो माने यांच्या विहिरीत गुरुवारी रात्री कोळ पडला होता. दरम्यान, नानासो माने हे शेताकडे गेले असता त्यांना विह्रीतून कोल्हा ओरडत्याला आवाज आला. यावेळी नानासो माने यांनी विहिरीत जाऊन पाहिले असता कोल्हा पडलेला दिसला. त्यांनी काही शेतकऱ्यांच्या मदतीने कोल्ह्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश आले नाही.

या घटनेची माहिती निसर्गप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमोल पाटील यांना दिली. त्यांनी तात्काळ वन परिमंडळ अधिकारी साताप्पा जाधव यांचेशी संपर्क साधला. जाधव यांनी तत्काळ वन्यजीव बचाव पथक पाठवून कोल्ह्याला बाहेर काढण्याची तयारी चालू केली. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आले व त्या कोल्ह्यास कोणतीही इजा नसल्याचे पाहून त्याच ठिकाणी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

या बचाव कार्यात वन्यजीवबचाव पथकातील अमोल चव्हाण, मतीन बागी, ओंकार काटकर,माळी, आशुतोष सूर्यवंशी निसर्गप्रेमी मित्र मंडळ वडगाव चे डॉ अमोल पाटील, डॉ शुभम करडे, प्रणव कांबळे तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.