कळे ( प्रतिनिधी ) शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाटबंधारे विभागाकइून पाणी साठवण्यासाठी बरगे घातले जातात. राज्यात लवकरच मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचं हवामान खात्याने जाहीर केले आहे. पाटबंधारे विभागाकडून धामणी खोऱ्यातील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बरगे काढण्याची लगबग सुरु झाली आहे. कुंभी नदीवरील असणाऱ्या कळे-सावर्डे ( ता.पन्हाळा ) बंधाऱ्यावरील बरगे काढण्याचे काम सुरू झाले आहे.

पाटबंधाऱ्याच्या योग्य नियोजनामुळे यंदा कुंभी व धामणी नदीत आजअखेर मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांना कडक उन्हाळ्यात ही मुबलक पाणी उपलब्ध झाले. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक पाणी मिळाले. 

परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाचा पेरा साधण्यासाठी मशागतीची कामे पूर्ण केली असून रोहिणी नक्षत्रामध्ये भात पिकांचे तरवे पेरले आहेत. परिसरात पाऊसाने हजेरी लावली असून चार-पाच दिवसापासून ढगांची गर्दी होत आहे. दरम्यान एक जूनपासून बंधाऱ्यांत पाणी साठवण्यासाठी असणारे बरगे काढले जात आहेत. चार-पाच दिवसापासून कुंभी नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या कळे-सावर्डे बंधाऱ्यामधील बरगे ( लोखंडी प्लेटा ) काढण्याची लगबग सुरू झाली आहे.