मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा खुलासा नितीन गडकरींनी केला. त्यावरुन आता राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. आता यावर विविध नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांच्या विधानवर भाष्य केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत..?
संजय राऊत म्हणाले , नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्य असे नेते आहेत. त्यांना पंतप्रधान पदासाठी तडजोड करा, असं कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकूमशाही एखाधिकारशाही सुरू आहे. ज्या पद्धतीने आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरू केला. दहा वर्षापासून सुरू आहे. त्याच्याशी तडजोड करू नका त्या प्रवृत्तीची तडजोड करू नका ही भूमिका त्यांच्याकडे कोणी जर मांडली असेल तर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याने त्यात चुकीचं केलं असं आहे मला वाटत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जगजीवन राम यांनी 1977 साली काँग्रेस पक्षातून याच मूल्यांसाठी बंड केलं होतं आणि इंदिरा गांधीचा पराभव झाला होता. जर देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल न्यायपालिकेचे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर काही जणांना सत्तेतल्यांचा त्याग करावा लागतो तो त्याग केला म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाले, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
नितीन गडकरी काय म्हणाले?
नागपूरमधील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याला नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली गेली होती. तुम्ही जर पंतप्रधान होणार असाल तर तुम्हाला आमचं समर्थन असेल. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पाठिंबा का देत आहात? आणि मी तुमचं समर्थन का घेऊ? मी त्यांना सांगितलं की पंतप्रधान होणं हे माझं ध्येय कधीच नव्हतं. मी पूर्णपणे झोकून देऊन माझं काम करतो. माझ्या कामावर माझी श्रद्धा आहे, असं नितीन गडकरी या कार्यक्रमात म्हणाले.