कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : ‘स्मॅक’ क्रिकेट टूर्नामेंट मध्ये अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रत्ना उद्योगने यश टायगर्स वर सात धावांनी विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते चषक देऊन रत्ना उद्योग चा गौरव करण्यात आला. उपविजेता संघ यश टायगर्सलाही यावेळी चषक देण्यात आले.

‘स्मॅक’ चे चेअरमन राजू पाटील, ‘गोशीमा’चे अध्यक्ष स्वरूप कदम, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष अजय सप्रे प्रमुख उपस्थित होते.

आमदार क्षीरसागर म्हणाले मालक कामगार आणि अधिकारी यांच्यातील नाते दृढ करण्यासाठी अशा पद्धतीच्या क्रीडा स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. 

ते पुढे म्हणाले, कामगारांच्या संघटना चालवत असताना संस्था व उद्योग टिकला पाहिजे तरच कामगार जगतो. त्यामुळे मालक अधिकारी व कर्मचारी आणि संघटना चालक यांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. नेरुळ व पुण्याला असलेल्या  डी. वाय. पाटील क्रीडांगण च्या पद्धतीने कोल्हापुरात सुसज्ज व अत्याधुनिक पद्धतीचे अद्यावत क्रीडांगण गोकुळ शिरगाव जवळ विकास वाडी येथे तयार करण्यासाठी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती व आपण प्रयत्नशील असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले. यासाठी शासनाने  जागा देखील देण्याचे ठरवलेलंआहे यासाठी निधी देखील मिळेल. अर्थात हे करत असताना शास्त्रीनगर स्टेडियम च्या बाबतीत देखील आपल्याला विसरून चालणार नाही. कोल्हापूर मधील ए. बी. सी. डी.  वॉर्डामध्ये फुटबॉलचे जास्त वेढ आहे आणि ई वॉर्डामध्ये क्रिकेट जास्त खेळलं जात. या स्पर्धेत स्वतः मालक अधिकारी आणि कर्मचारी अश्या बारा संघानी सहभाग घेतला ज्यांना विजेते पद मिळाले त्यांचे अभिनंदन करतोच पण उर्वरित सर्व संघांचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्वमालक वर्ग, खेळाडू, अधिकारी वर्गयांचे त्यांनी कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले.

‘स्मॅक’ क्रिकेट टूर्नामेंट मध्ये एकूण बारा संघ सहभागी झाले होते. यापैकी आठ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र होते. यश टायगर्स [यश मेटॉलिक्स] विरुद्ध एस.बी.आर. चॅलेंजर्स [एस.बी. रिशेलर्स] सरोज वॉरियर्स [सरोज ग्रुप ऑफ कंपनीज] विरुद्ध रत्ना उद्योग, झंवर ग्रुप चॅम्पियन्स [झंवर ग्रुप] विरुद्ध मिस्टेर मार्व्हेलस [मिस्टेर हेल्थ अँड हायजिन] आणि सवेरा इलेव्हन [मयुरा ग्रुप] विरुद्ध कोहिनूर मेटॅलिक्स असे चार उपांत्यपूर्व सामने झाले.

तर यश टायगर्स विरुद्ध झंवर ग्रुप चॅम्पियन्स आणि रत्ना उद्योग विरुद्ध कोहिनूर मेटॅलिक्स यांच्यात उपांत्य सामने झाले.अंतिम सामन्यात यश टायगर्सने आठ षटकात पाच गाडीच्या मोबदल्यात एकाहातर धावा केल्या, कर्णधार अनिल माळीने अठरा चेंडूत चार षटकार व एक चौकार लगावत चावतीस धावा केल्या. रत्ना उद्योग ने चार गडी बाद त्र्याहत्तर धावा करत दोन धावांनी विजय मिळवला. त्यांच्या अक्षय पाटील ने चवदा चेंडूत वीस धावा व वैभव तासगावकर ने बारा चेंडूत पंधरा धावा केल्या. अंतिम सामन्यापूर्वी यश टायगर्स विरुद्ध झंवर ग्रुप चॅम्पियन्स यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला.अत्यंत चुरशीच्या या सामन्यात झंवर ग्रुप चॅम्पियन्स चा पाच धावांनी पराभव करत यश टायगर्स ने अंतिम सामन्यात प्रवेश केला.यश टायगर्सच्या अनिल माळी ने दहा चेंडू पस्तीस धावा काढल्या. विनायक सावंत यांने दोन षटकात सात धावा देत दोन बळी घेतले.

रत्ना उद्योग विरुद्ध कोहिनूर मेटालिक्स यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला.रत्ना उद्योग ने कोहिनूर मेटॅलिक्स वर सहा धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.रत्ना उद्योगच्या वैभव तासगावकर ने तेवीस चेंडूत चवतीस धावा केल्या व दोन षटकांत चोवीस धावा देत तीन बळी घेतले.उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज [ मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ] असा दुहेरी किताब रत्ना उद्योगच्या ओमकार कुंभार याला मिळाला, त्याने अष्टपैलू कामगिरी करत एकशे एकोनेएंशी धावा काढल्या त्याचबरोबर चार गडी बाद केले तर यश टायगर्सच्या विनायक स्वामी ला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले, त्याने आठ गडी बाद केले. 

पहिल्या उपांत्य सामन्यासाठी यश मेटल्स चे अनिल माळी व दुसऱ्या सामन्यासाठी रत्ना उद्योग चे वैभव तासगावकर तसेच उपांत्यपूर्व सामन्यासाठी कोहिनूर मेटॅलिक्स चे साहिल मोमीन व अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून वैभव तासगावकर यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

अंतिम सामन्यासाठी ‘स्मॅक’ चे ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे, खजानिस बदाम पाटील, संचालक नीरज झंवर, अतुल पाटील, रणजित जाधव, निमंत्रित सदस्य एम. वाय. पाटील, अजिंक्य तळेकर,  , उद्योजक नितीन पाटील, भीमराव खाडे, उदय साळोखे, शंतनू जाधव, आदित्य जाधव, सुश्मिता सप्रे – जाधव आदी उपस्थित होते.