कपिलेश्वर (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाजबांधवांनी मुधाळतिट्टा येथे रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांनी सुमारे तासभर गारगोटी-कोल्हापूर मार्ग रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन मुरगुडचे सपोनि शिवाजी करे, गारगोटीचे सपोनि सचिन पाटील यांना देण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी आपली भूमिका मांडत, आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. मात्र, काही ठराविक नेतेमंडळी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न मराठा समाज कदापी यशस्वी होऊ देणार नाही. मंत्री छगन भुजबळ, आ. गोपीचंद पडळकर, निलेश राणे, गुणरत्न सदावर्ते ही मंडळी आपली किंमत वाढवण्याच्या हेतूने मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. या नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही आंदोलकांनी केली.
यावेळी मनसेचे अशोक पाटील, कॉम्रेड सम्राट मोरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज येडूरे, आनंदा पाटील, ओंकार चव्हाण, सागर पाटील, निवास पाटील, रणजित पाटील, बबन पाटील, चंद्रकांत पाटील, हेमंत पाटील, सचिन भांदीगरे, मच्छिंद्र मुगडे आदी उपस्थित होते.