मुंबई – काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची वैजापूर या ठिकाणी सभा झाली होती. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या आ. रमेश बोरनारे यांच्यावर ठाकरेंनी या सभेतून टीका केली. वैजापुरातील सभेनंतर आ. बोरनारे यांनीही ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला.


रमेश बोरनारेंनी ‘हा’ गंभीर आरोप ठाकरेंवर केला …


उद्धव ठाकरेंवर आ. रमेश बोरनारे यांनीही सभेतूनच प्रत्युत्तर करत निशाणा साधला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देणार होते, असा गंभीर आरोप करत त्यांनी एक किस्सा सांगितला. म्हणाले की, “40 आमदारांनी पक्षाशी गद्दारी करून महाराष्ट्राच्या मातीला गद्दारीचा कलंक लावला. वैजापूरच्या आमदाराने या भूमीलाही कलंक लावला आहे. येणाऱ्या निवडणुकीत बोरनारे यांना पराभूत करून उलटे टांगा”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

बोरनारे पुढे म्हणाले की, “काल ते वैजापूरला येऊन माझ्यावर टीका करून गेले. आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करताना पाहिले असते, तर त्यांनीच तुम्हांलाच उलटे टांगले असते.” असं वक्तव्यही रमेश बोरनारे यांनी केलं आहे.

“मागील निवडणुकीत मला सहज उमेदवारी मिळाली नाही. ते शेवटच्या क्षणी पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते. मात्र, मी त्यांना भेटून सांगितले की, गेल्या 25 वर्षांपासून मी शिवसेनेसाठी किती काम केले आहे. त्याचबरोबर, “माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिले नाही, तर शिवसैनिक आत्महत्या करतील.” असंही बोरनारे ठाकरेंना म्हणाले होते असं त्यांनी यावेळेस सांगितलं आहे.

“माजी मुख्यमंत्र्यांचा तोल ढासळला आहे. त्यामुळेच ते एका आमदारावर टीका करू लागले आहेत. ते त्यांना शोभत नाही. आम्हाला वाटले होते की, वैजापूरला आल्यावर ठाकरे एखाद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील. पण, ते आले आणि टीका करून गेले”, असे म्हणत बोरनारेंनी ठाकरेंना डिवचले.