मुंबई/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीचे महाविकास आघाडीशी फिस्कटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सवता सुभा मांडला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी जुळत नाही असे वाटल्यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रे चा नारा दिला होता. यावेळी त्यांनी आपली पहिली यादी जाहीर करताना 8 उमेदवारांना संधी दिली होती, तर रविवारी (31 मार्च) दुसरी यादी जाहीर करताना 11 उमेदवारांना संधी दिली. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे रमेश बारसकर यांना वंचितने माढामधून उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून रमेश बारसकर यांची हकाटपट्टी करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या दुसऱ्या यादीत माढा या लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर रमेश बारसकर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रदेश चिटणीसपदी कार्यरत होते.

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांपैकी आतापर्यंत 19 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. वंचितने रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर करताना 11 उमेदवारांना संधी दिली. हिंगोलीतून बी. डी. चव्हाण, लातूरमधून नरसिंग उदगीकर, सोलापूरमधून राहुल गायकवाड, माढातून रमेश नागनाथ बारस्कर, साताऱ्यातून मारुती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकंगलेमधून दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटील, रावेरमधून संजय ब्रह्मणे, जालनातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्यमधून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग काका जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.