मुंबई : शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन बुधवारी (दि. 19) साजरा करण्यात आला. शिवसेनेने (शिंदे गट) वर्धापन दिनाचा कार्यक्रम वरळीतील NSCI डोममध्ये आयोजित केला होता. वरळी हा शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघातच शिवसेनेने वर्धापन दिनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना रामदास कदम यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागांवरून भाजपला इशारा दिला.
यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले की, ” विधानसभेत गाफील राहू नका. भाजपला विनंती करा. वेळेवर एकनाथ शिंदे यांचे 15 उमेदवार 2 महिन्यांपूर्वी दिले असते तर आज चित्र वेगळे असते. शिंदेंचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपची मंडळी उटायची आमची जागा…आमची जागा. शिंदे साहेब हे थांबवा नाहीतर मला घेऊन जा. शिंदे साहेब मोदी- शाहांना सांगा, 100 उमेदवार द्या 90 आमदार नाही निवडून आणले तर तुम्ही सांगाल ते करू. जर असा विश्वास व्यक्त करत भाजपला इशाराही दिला.
काय म्हणाले रामदास कदम?
लोकसभेच्या जागावाटपावेळी जे झालं ते अतिशय घृणास्पद झालं. रायगड आमचं, रत्नागिरी आमचं, अमरावती आमचीच असं सगळं भाजपने केलं. अतिशय विश्वासाने आम्ही भाजपसोबत गेलो होतो. जर एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असती तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या.
अमरावतीची जागा आमच्याकडून घेतली. त्या ठिकाणी अडसूळ आधी पडले होते ते ठीक. पण मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोनवेळा खासदार असतानाही ती जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. त्यामुळे हा प्रकार पुन्हा न होता विधानसभेला आम्हाला 100 जागा द्या, म्हणजे आधी काम करता येईल.
सर्व्हेच्या नावाखाली उमेदवार बदलले
भाजपला देखील सर्व्हेचं प्रकरण पटलं नसावं. फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी सर्व्हे पुढे केला का असा प्रश्न पडतो. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, काही उमेदवार आमच्यावर लादले. पण भाजपच्याही जागा पडल्या, त्यावर काय म्हणायचं? भावना गवळी, हेमंत गोडसे नको असं भाजपचं मत होतं. पण आम्ही तुमच्या जागांवर कधी बोललो का? तुमच्या उमेदवारांवर आक्षेप घेतले का?
अजित पवार यांची प्रशासनावर पकड चांगली आहे, ते चांगलं काम करतात. माझं म्हणणं एवढंच होतं की, त्यांना महायुतीत घ्यायला थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती. एकनाथ शिंदेंनी ज्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता, ते बिचारे जॅकेट घालून बसले नसते. 9 मंत्रिपदं मिळाली असती तर त्यामुळे शिवसेनेची बांधणी अधिक भक्कम झाली असती.
शिवसेनेला 100 जागा हव्यात
शिवसेनेला येत्या विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा हव्यात असं सांगताना रामदास कदम म्हणाले की, आमच्याकडे आता 50 आमदार आहेत. गेल्या वेळी आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आता आम्हाला 100 जागा हव्यात. त्या दिल्या नाहीत तर सगळ्या जागा आमच्याच. भाऊ भाऊ म्हणता तर मग वाटून खाऊ.
उद्धव ठाकरेंनी लोकसभेच्या 21 जागा लढवल्या, मग आम्हाला कमी का मिळाल्या. आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या तर आणखी खासदार निवडून आले असते. तुलाही नाही आणि मलाही नाही असं व्हायला नको. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला सत्ता आणायची आहे.