कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारीरिक आणि त्याहून अधिक मानसिक कसोटीचा कस लागणारी आयर्न मॅन ही स्पर्धा विजयी होणे यासह जीवन संघर्षातील यशस्वी प्रवासासाठी आयर्न मॅन दृष्टी येणे हे अगदी मोलाचे आहे असे हितगुजभर मनोगत आयर्नमन आंतरराष्ट्रीय ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या स्पर्धेत विजेता ठरलेल्या राजवर्धन सचिन घाटगे यांनी व्यक्त केले. शिवाजी पेठ सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशालेमध्ये त्याचा हा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी ऑस्ट्रेलियामध्ये संपन्न झालेली आयर्न मॅन स्पर्धा आणि त्यासाठी राजवर्धन ने कोल्हापूरसह गोवा या ठिकाणी केलेला रनिंग-सायकलिंग आणि स्विमिंगचा सराव याचा व्हिडिओपट एल.ई.डी स्क्रिनवर पाहुणे आणि विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.

सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक आर. वाय. पाटील यांनी करत विद्यार्थी दशेमध्येच एक सकारात्मक दृष्टी वाढीस लागावी यासाठी आयर्न मॅन राजवर्धनच्या यशाचे अनुभव सर्वच युवकांना आणि विद्यार्थ्यांना मोलाचे नक्कीच ठरतील असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमामधील भूमिका विषय करताना समन्वयक पत्रकार आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे यांनी सराव आणि सातत्याने कोणत्याही कार्यक्षेत्रात यशस्वी होणे यासाठी अगदी कमी वयामध्ये राजवर्धन घाटगे यांनी कृतीशील आदर्श सर्वात ठेवला आहे आणि त्यांच्या अनुभवातून सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्याचे हाफ आयर्न मॅन ही स्पर्धा यशस्वी केलेले वडील सचिन घाटगे यांनी या स्पर्धेच्या पूर्वतयारी संदर्भात मार्गदर्शन करताना मानसिक कणखरता बळकट झाल्यावर त्या बरोबरीने येणारे सर्व योग आणि मिळणारे अंतिम यश आणि या प्रवासाचा मनस्वी आंनद घेणे या पैलुनी आपले अनुभव कथन केले.

क्रीडा क्षेत्रातील संपन्नता ही त्या देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीचे लक्षण असते आणि त्याच संदर्भाने राजवर्धन सचिन घाटगे यांनी आंतरराष्ट्रीय पातळी मिळवलेली यश हे लाख मोलाचे आहे असे अशा शब्दात ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक आणि राज्य पुरस्कार विजेते एस. व्ही. सूर्यवंशी यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. माजी महापौर बाजीराव चव्हाण यांनी कोल्हापूरची क्रीडा परंपरा ही फार मोठी आहे. कुस्ती बरोबरीनेच बुद्धिबळ, स्विमिंग, फुटबॉल यासह आता आयर्न मॅन या स्पर्धातून कोल्हापूरची जागतिक पातळीवर होणारी नवी ओळख ही नक्कीच अभिमानाची आहे.

महानगरपालिका स्थानिक प्रशासन यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचा लाभ शालेय आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवावा. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी या मान्यवरांसह दत्त तरुण मंडळ आणि छावा संघटनेचे अध्यक्ष राजू सावंत यांच्या हस्ते आयर्नमन ठरलेल्या राजवर्धन सचिन घाटगे यांचा शालपुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ऑस्ट्रेलियामधील या स्पर्धेतील 4 किलोमीटर स्विमिंग,180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग आणि स्थानिक नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद याविषयी त्यांनी आपले अनुभव विषद केले. मुख्य कार्यक्रमानंतर राजवर्धनला मिळालेल्या मेडल्स समावेत प्रोत्साहित झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने फोटोही काढले. आदर्श प्रशालेच्या सर्व विद्यार्थी वर्गाची सकारात्मक दृष्टी अधिक व्यापक करणारा असाच हा सत्कार सोहळा संपन्न झाला.