मुंबई : लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने मुंबईत कोल्हापूर वासियांसाठी भव्य असे कोल्हापूर भवन उभा करणार असून त्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे माहिती मनसेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे नेते युवराज येडूरे, प्रकाश पाटील यांनी दिली.
करवीर नगरी कोल्हापूर राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे.या जिल्ह्यामधून हजारो तरुण नोकरी, धंदा आणि व्यवसाय निमित्त आता मुंबईत स्थायिक झाले आहेत.कोल्हापूर मधून आलेले हे नागरिक बहुतांश करून मुंबईत लालबाग, परळ, डिलाईल रोड, शिवडी या ठिकाणी वास्तवाला आहेत. त्यामुळेच परळ-लालबाग, डिलाईल रोडला मिनी कोल्हापूर असेही संबोधले जाते.मुंबई शहरातील जागेच्या किमतीं अफाट असल्याने, या नागरिकांना भेटायला येणाऱ्या, वैद्यकीय उपचारासाठी आणि नोकरी धंदा करण्याच्या शोधासाठी कोल्हापूरहून मुंबईला आलेल्या नागरिकांना येथे भाड्याने घर घेणेही अशक्य होते. त्यामुळे हक्काचे कोल्हापूर भवन मुंबईत निर्माण व्हावे यासाठीची कोल्हापूरकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्याध्यक्ष, मनसेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे नेते युवराज येडूरे यांनी कोल्हापूर भवनाचा प्रस्ताव तयार केला असून यासाठी लागणारी जागा उपलब्ध आहे, हा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्याकडे देणार आहे, तसेच शासकीय स्तरावरील मान्यता संदर्भात ते पाठपुरावा करत असून लवकरच या जागेमध्ये शुभारंभ करून कोल्हापूर भवन उभा करणार असल्याची माहिती युवराज येडूरे यांनी दिली.