मुंबई (प्रतिनिधी ) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात रंगत आली आहे. एका पक्षाच्या दुसऱ्या पक्षावर टीका, आरोप – प्रत्यारोप वाढताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावरून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या विषयी स्पष्ट मत मांडले आहे. ते म्हणाले की, ‘मी माझ्या पक्षाचे नाव आणि चिन्ह स्वतःच्या मेहनतीने कमावले आहे, कोणाची ढापलेली नाही. आमची निशाणी ही निवडणुकीच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात मिळाली आहे. लोकांच्या मनातून आलेली आहे, कोर्टातून नाही. मला स्वतःला नवीन पक्ष काढायचा होता, म्हणूनच मी मेहनतीने मनसेची ओळख निर्माण केली आहे. अनेकांना वाटलं की मी शिवसेनेवर दावा करेन, पण मला त्याचं विचारसुध्दा शिवला नाही. फक्त शिवसेनेत माझं स्थान काय असेल एवढा माझा प्रश्न होता’ असं ते म्हणाले.
आता राज ठाकऱ्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.