मुंबई ( प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकांचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. त्याचबरोबर राजकीय नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे . अश्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन खेळी मातोश्रीच्या अंगणात खेळली असल्याचं पहायला मिळतंय.

नारायण राणेंना धोबीपछाड करणारी महिला नेता भाजपला रामराम ठोकत मनसे मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तृप्ती सावंत यांना मनसेकडून उमेदवारी मिळाली असून त्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्या झिशान सिद्दीकींविरुद्ध निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. तृप्ती सावंत यांनी लढवलेली 2015 मधील वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक फारच गाजली होती. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळी शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती.

2015 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याविरोधात काँग्रेसकडून नारायण राणेंना रिंगणात उतरण्यात आलं होतं. थेट ‘मातोश्री’ला चॅलेंज देण्यासाठी नारायण राणे यांनी शड्डू ठोकला होता. आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर असणारी ही निवडणूक, चांगलीच चुरशीची झाली होती. ‘मातोश्री’च्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास 20 हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता.