मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत दिली नाही. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळं या आठवडाभरात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. याचा परिणाम कोकणासह मुंबईचे किनारा क्षेत्र, उपनगरीय भाग आणि कोकणातील संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, चंद्रपूरला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित क्षेत्रांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रही पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे जलप्रवाह वेगाने वाहणार असून पावसाळी सहली काढणाऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या कमी दाबाचा एक तीव्र पट्टा दक्षिणेकडे सक्रिय असून, राजस्थनातील जैसलमेरकडेही पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तर, गुजरातपासून केरळपर्यंत पावसाचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं सध्या संपूर्ण देशभरात मान्सूनसाठी पूरक वातावरण पाहायला मिळत आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढल्यामुळं ओडिशापासून आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाब क्षेत्र अधिक प्रभावीपणे तयार होताना दिसत आहे. परिणामी राज्यातील कोकण आणि विदर्भ पट्टा यामुळं प्रभावित होताना दिसणार आहे.