पुणे ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निर्णय दिला असून, राष्ट्रवादीतील दोन गटापैकी नेमकी कोणत्या गटाला अधिकृत घोषित केले जाणार यावर आज नार्वेकरांनी निकाल दिला आहे, यात अजित पवार गटाने सरशी मारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून तीन तर अजित पवार गटाकडून दोन याचिका सादर करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांवरून पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ गट यावरून यासंदर्भातला निर्णय घेतला गेला असल्याचे राहुल नार्वेकर यांनी हा निकाल देताना म्हटले आहे.

तसेच नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे हे निश्चित होत नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निकाल दिला असल्यांच नार्वेकर यांनी म्हटले आहे. असे असले तरी नार्वेकरांनी दिलेला हा निकाल सध्या शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.