मुंबई : पंढरपूरची वारी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. या वारीत राहुल गांधीही सहभागी व्हावे यासाठी शरद पवार यांनी निमंत्रण दिले होते. आता राहुल गांधी यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून 14 जुलै 2024 रोजी वारीत सहभागी होणार असल्याची माहिती पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.

अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आषाढी वारीची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. आषाढीनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश राज्यांसह संपूर्ण देशभरातून वारकरी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. एकदा तरी वारी अनुभवावी अशी सर्वांची इच्छा असते. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बडे राजकीय नेतेही वारीत सहभागी होणार आहेत. यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा समावेश असणार आहे.

राहुल गांधी वारीत चालणार
आमदार संजय जगताप म्हणाले की, संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यात दीड लाख वारकरी सहभागी झाले आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे दर्शन ते वारीत घेणार आहेत. तसेच सर्वसामान्य वारकऱ्याप्रमाणे राहुल गांधी वारीत चालतील.

राहुल गांधी यांना वारीत सहभागी होऊ न देणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर ही संजय जगताप यांनी उत्तर दिले आहे. वारीच्या सोहळ्यात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा. तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर वारीत सहभागी व्हा. वारीच्या सोहळ्यात काय त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न करा.