चंदगड (प्रतिनिधी) : फराळे येथील राधा शुगर कारखान्याने २०१८-१९ सालची एफआरपी थकबाकी त्वरीत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. तसेच प्रसंगी कारखाना प्रशासनावर गुन्हा दाखल करावी, अशी मागणी उस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांकडून याबाबतचे निवेदन आज (शुक्रवार) चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले.
चंदगड तालुक्यामध्ये ऊसाचे पीक जास्त प्रमाणात असल्यामुळे येथील ऊस आजूबाजूच्या जवळपास पाच ते सहा कारखान्यांना पाठवला जातो. २०१८-१९ साली चंदगडमधील ऊस उत्पादकांनी राधानगरी तालुक्यातील फराळे येथील राधा शुगर कारखान्याकडे उस पाठवला. सुरवातीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी या कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस पाठवला. यापैकी काही उत्पादकांची बिले लवकर काढून लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केलं. पण त्यानंतर उर्वरित एफआरपीप्रमाणे रक्कम तीन वर्षे झाली तरी अजून दिलेली नाही. उत्पादक शेतकऱ्यांनी वारंवार कारखान्याशी संपर्क साधूनसुद्धा तेथील प्रशासन याची दाखल घेत नाही. कारखाना ऑफिसमध्ये फोन घेतला जात नाही. अनेक उत्पादक शेतकरी बिलासाठी कारखान्यावर फेऱ्या मारून कंटाळले.
त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आज मीटिंग घेतली आणि निवेदनाच्या माध्यमातून तहसिलदार यांचेकडे आपल्या व्यथा व्यक्त केल्या. कारखान्याने २०१८/१९ मधील फक्त २४७५ तर व दुसरा हप्ता ११६ रु. जमा केलेला आहे. पण उर्वरित एफआरपी रक्कम आजपर्यंत जमा केली नाही. या बाबतीत त्यांच्याशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कारखान्याशी अनेक वेळा संपर्क केला पण उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. लवकर रक्कम न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल आणि कारखाना प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला.
या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष नितीन फाटक, जोतिबा कदम, तुकाराम खोराटे, तुकाराम पाटील, रमेश पाटील, चंद्रकांत खोरटे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.