कागल ( प्रतिनिधी ) : दर्जेदार आणि गुणवत्त प्राथमिक शिक्षणाने देश सुदृढ आणि समृद्ध होईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील संत रोहिदास विद्यालयात इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या प्रज्ञाशोध सराव परीक्षा प्रारंभात ते बोलत होते.

कागल पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित या सराव परीक्षांसाठी येथील सचिन धोंडीराम पोवार (मटकरी) यांच्यावतीने प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्या. मुश्रीफ यांची वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मटकरी यांच्यावतीने या प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्या.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शैक्षणिक उठावाच्या भूमिकेतून गेली 17 वर्ष अखंडपणे नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन हे काम करीत आहे. दरवर्षी सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यापुढेही या परीक्षा अखंडपणे सुरू राहतील. शिक्षकांवर ज्ञानदानासारखी पवित्र आणि राष्ट्र निर्माणच्या कार्याची जबाबदारी आहे. त्यानी झोकून देऊन काम केल्यास ज्ञानाधिष्ठित आणि समृद्ध विद्यार्थ्यांची पिढी तयार होईल. या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आणि पर्यायाने शिक्षकांचेही मूल्यमापन होईल. स्वाभाविकच शैक्षणिक विकासासाठी त्याचा चांगला उपयोग होईल.

मंत्री मुश्रीफ भाषणात म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील आपल्या विजयाबद्दल आणि मंत्रीपद मिळाल्याबद्दल सचिन मटकरी यांनी फटाके न उडवता आणि डिजिटल फलक न लावता तो खर्च शैक्षणिक कार्यासाठी लावला. त्यांचा हा उपक्रम निश्चितच विधायक समाजोपयोगी आणि शिक्षणाला पाठबळ देणाराआहे.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, श्रीनाथ समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे, माजी नगराध्यक्ष अशोकराव जकाते, गंगाधर शेवडे, बाळासाहेब निंबाळकर, एस. व्ही. पाटील, सुनील पाटील, प्रकाश मगदूम, संजय दाभाडे यांच्यासह इतर मान्यवर आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

स्वागत आणि प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार मुख्याध्यापक शहाजी गायकवाड यांनी मानले.