सरवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी सरवडे जिल्हा परिषद मतदार संघात उच्यांकी मताधिक्य देणार असल्याची घोषणा केली. तर जनता दल आणि विठ्ठलराव खोराटे यांच्या पाठींब्याने राधानगरीत केपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर आबीटकरांना बळ मिळाले आहे.
खोराटे म्हणाले, राधानगरी मतदार संघाची रचना विस्ताराने मोठा व २७२ किमी लांबीचा असा अवघड मतदार संघ आहे. अशा या दुर्गम मतदार संघातील प्रत्येक गावात आमदार प्रकाश आबिटकर यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या वाकीघोलातील सर्व रस्ते आमदार आबिटकर यांनी चकाचक केले आहेत. विरोधकांनी कोणतेही काम केले नाही त्यांच्याकडे बिद्रीची सत्ता असल्याने मोठी झुल चढली आहे. मतदार संघातील माणसांना कोण काय केलं याची चांगली माहिती आहे.
आमदार आबिटकर कामाचे आमदार आहेत. प्रत्येक मतदारांशी संपर्क साधून आमदारांनी केलेले काम तळागाळातील माणसांपर्यंत पोहचवा. लाडकी बहिण योजनेमुळे सर्वसामान्य माणसांच्या अर्थकारणाला चांगली गती मिळाली आहे. चांगले निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरवडे जिल्हा परिषद संघातील जनता आमदार प्रकाश आबीटकर यांच्या पाठीशी असून मोठे मताधिक्य देणार असल्याचे खोराटे यांनी सांगितले.
प्रकाश आबिटकर म्हणाले, राजकारण, समाज कारणातले आदर्श व्यक्तिमत्व म्हणून खोराटे यांच्याकडे पाहतो. मी तुमच्यातलाच एक आहे. तुमच्याकडूनच मला विचारांचे बाळकडू मिळाले. याबद्दल आयुष्यभर कृतज्ञ राहिन. स्वर्गीय आमदार शंकर धोंडी पाटील यांच्या प्रचारासाठी हातात माईक घेऊन वाड्या-वस्त्या पिंजून काढल्या. त्यांच्या विजयात गुलालात रंगून मीच आमदार झाल्यासारखे नाचत होतो. हीच समाजवादी जनता माझ्याबरोबर आहे.वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र एकवटले आहेत.
के. पी. पाटील यांनी दहा वर्षांत जे करायला पाहिजे होत ते केलं नाही फक्त आणि फक्त स्वतःच हित जोपासले. सर्व कामांचे मुल्यमापन जनता करते. समाजाचं काम करणारा व लोकांना अपेक्षित असणारा विकास करतोय. सर्व कामांना गती देण्याचे काम करतोय. भविष्य काळात या मतदारसंघाला सुजलाम, सुफलाम करण्यासाठी काम करुया. लोकांच्यातून खुप चांगला प्रतिसाद मिळतोय. लोकसभेला माणसं थांबत नव्हती. आता मात्र माणसं थांबून प्रतिसाद देत आहेत. पैसा, सत्ता हे बाजुला ठेवून माझ्या सारख्या सामान्य माणसाबरोबर जनता आहे. अभुतपुर्व विजय मिळवण्यासाठी जनता दल पक्षाच्या पाठींब्याने मोठे बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नंदकिशोर सुर्यवंशी-सरकार, दत्तात्रय उगले, अरुणराव जाधव, ॲड.प्रशांत भावके, शाकीर पाटील-तुरंबे, धैर्यशील भोसले, सुभाष पाटील-मालवेकर, विलास येरुडकर, मधुकर कांबळे, राधानगरी संघाचे संचालक दत्तात्रय धनगर, वैशाली पाटील, राजाराम देवर्डेकर, शुभम पाटील, सुनील गुरव, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.