कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – ताराबाई गार्डन हे शहरातील प्रमुख उद्यानांपैकी एक आहे. परिसरातील अनेक लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, तसेच पर्यटक या उद्यानात वॉकिंग, खेळ, योग करण्यास तसेच विसावा घेण्यास येतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या उद्यानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून येथील सोईसुविधा वाढवाव्यात अशी मागणी आम आदमी पार्टीने उपायुक्त साधना पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
ताराबाई गार्डन येथे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत लँडस्केपींग करण्यात येणार आहे. हे लँडस्केप प्रशस्त लॉन असलेल्या खुल्या जागेमध्ये आहे. केलेले डिझाईन मुलांना खेळण्यासाठी अडचण करणारे आहे. तसेच येथे भरणाऱ्या योग वर्गास देखील जागे अभावी याची अडचण होणार आहे. तरी याच बजेट मधून गार्डन मध्ये उच्च प्रतिची देशी झाडे तसेच फुलांची झाडे वापरून सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी आप चे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली.
यासोबतच कर्मचारी कमी असल्याने झाडांना वेळेवर पाणी घालणे शक्य होत नाही. यासाठी उद्यान विभागात भरती करावी, लहान मुलांना ट्रॅफिक नियमांची ओळख व्हावी यासाठी उद्यानात ट्रॅफिक लाईट द्वारे सिग्नल सिस्टम लावण्यात आली आहे. परंतु गेले दोन वर्षे ही सिस्टीम बंद असून ती त्वरित सुरु करण्यात यावी. तसेच सिग्नलचे प्रशिक्षण देण्यासाठी आरटीओ सोबत मिळून महिन्यातून काही ठराविक दिवस येथे वाहतूक प्रशिक्षण नियम शिकवण्यात यावेत, उद्यानातील झाडांचे नामकरण (साइन्टिफिक आणि जेनेरिक नावे) करणाऱ्या पाट्या उपलब्ध पुन्हा लावण्यात याव्यात, उद्यानाच्या कट्ट्यावर बसून मद्यपान करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा.
उद्यानातील खेळणी खराब झाली आहेत. खेळणी बदलण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे, त्याची प्रक्रिया जलद करून चांगली, टिकाऊ व वापरा योग्य खेळणी बसवण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ताराबाई गार्डन परिवार ग्रुपचे कार्यवाहक संजय घाटगे (वंदूरकर), आप सचिव समीर लतीफ, प्रतीक माने आदी उपस्थित होते.