अहमदनगर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवासी बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. प्रवरा नदीत काल दोन तरुण बुडाले असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. या शोधकार्यादरम्यान एसडीआरएफची बोट उलटली आणि तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रवरा नदी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उकाड्याने त्रस्त झालेले अनेकजन या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी जात आहेत. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सुगाव मधील रोपवाटीके जवळील पात्रात दोन युवक पोहण्यासाठी प्रवरा नदीत उतरले होते. यावेळी पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने पोपट जेडगुले (वय २५), अर्जून रामदास जेडगुले (वय १८) या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, हे दोन्ही तरुण पाण्यात बुडाल्याने त्यावेळी तिथे असलेल्या गावकरी, पोलीस आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी शोध सुरु केला होता. त्यांना सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह शोधण्यात यश आले. पण सागर जेडगुले याचा मृतदेह सापडत नसल्याने त्याच्या शोधासाठी आज गुरुवारी सकाळी एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पण नदीपात्रात शोधकार्यासाठी उतरलेली एसडीआरएफच्या जवांनांचीही बोट उलटली. नदीपात्रात मोठा भोवरा व खड्डा असल्याने ही बोट उलटल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेत शोध पथकातील पाच आणि एक स्थानिक असे सहा जण बुडाले. यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एक पंकज पवार सुखरूप असल्याचे समजते. तर यातील अशोक पवार अत्यावस्थ असून त्यांच्यावर भांडकोळी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या एसडीआरएफच्या तीन जवानांचे मृतदेह सापडले आहेत. तर, पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख – वाकचौरे याचा व काल बुडालेला अर्जुन रामनाथ जेडगुले याचा देखील प्रशासनाकडून शोध सुरू आहे.