सोलापूर : भाजपने देशाला धर्माची आणि जातीची किड लावल्याची टीका करत मी राजकारणात टक्केवारी किंवा सत्तेसाठी आलेली नसून मला ईडीची भीतीही नाही,असा हल्लाबोल सोलापूरच्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमधील सभेत त्यांनी भाजप सरकारवर निशाना साधला.
लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. “मी लेक सोलापूरची” या टॅगलाईनवर प्रणिती सध्या भर देताना दिसून येत आहेत.दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे. जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही. मला फक्त एकदा आशीर्वाद द्या, मग बाकी सगळ टेन्शन माझं असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी दिलाय.
मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे. मागच्या 10 वर्षात मतदारांनी सगळं भाजपला दिलं. मात्र त्यांनी तुम्हाला ठेंगा दिला, भाजपने तुम्हाला धोका दिला, तुमचा विश्वासघात केला. मागील 10 वर्षात सोलापूरने निवडून दिलेल्या भाजपच्या खासदाराने काय काम केलं, हा एकच प्रश्न त्यांना विचारा, त्यांची बोलती बंद होईल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलचा वाढलेला भाव फक्त 2 रुपयांनी कमी केला म्हणजे ही लोक आपणाला भीक देतायत की काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.