कळे (प्रतिनिधी) : परतीच्या पावसामुळे यंदा काढणीला आलेल्या भात,सोयाबीन,भूईमुग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी महापुरामुळे नदीकाठची हजारो एकरातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच परतीच्या पावसामुळे अद्यापही माळराणातील पिके पाण्याखाली आहेत. शिवाय कापणीला आलेल्या पिकांत पाणी तुंबल्यामुळे पिके कुजली आहेत. या आसमानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तेव्हा संबधित विभागामार्फत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.

पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घर व इतर मालमत्तांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन पंचनामे युद्धपातळीवर करावेत. या नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गतवर्षीचा महापूर,जागतिक महामारी कोरोनाचे संकट,वीज दरवाढ,कर्जमाफीसह व्याज सवलतमधील घोळ,या संकटाच्या मालिकेत आताच्या अतिवृष्टीची भर पडली आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्याला दसरा- दिवाळीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत आला आहे.