कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी शासनाच्या योजनाव्दारे नागरीकांना पेन्शन दिली जाते. गांधीनगर, वळीवडे, उचगांव, रईकर कॉलनी, टैबलाईवाडी, सदरबाजार, विक्रमनगर, बापट कॅम्प आदी भागातील 4000 ते 5000 पेन्शन धारकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि., शाखा मार्केट यार्ड, कोल्हापूर या बँंकेत शासनामार्फत पेन्शन जमा केली जाते. पण या भागातील पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन मिळत नाही.
महिन्याच्या 15 ते 20 तारखेनंतर बँकेत पेन्शन वाटप केली जाते. त्यावेळेस बँकेमध्ये मोठया प्रमाणात पेन्शनधारकांची गर्दी होते. पेन्शनधारक म्हटला की, वयोवृध्द, आजारी अशा लोकांना आपल्या मार्केट यार्ड शाखेत येताना थेट बससेवा नसल्यामुळे तो रिक्षा करून जातो. 3 ते 4 जन पेन्शनधारक एकत्र जातात. सकाळी 11 वाजता आले की त्यांना साधारण 3 ते 4 वाजता पेन्शन भेटते आणि रिक्षावाला प्रत्येकी 100 ते 150 रूपये भाडे आकारतो. त्यातच एखादा दिवस हेलपाटा झाला की पेन्शन मधील रिक्षासाठी प्रत्येकी 200 ते 300 रूपये खर्च होतात आणि त्यांना औषधोपचारासाठी किंवा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मिळणारे पैसे अपुरे पडतात. तसेच पैसे जमा होवून ते तहसिलदार कार्यालयाकडून आले नाही असा प्रकार घडला की, पेन्शन धारक तहसिलदार कार्यालय गाठतो.
कोरोना नंतर बँकेच्या सहकार्याने आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उचगांव मध्ये एकाच ठिकाणी जेष्ठ नागरीकांना पेन्शनचे पैसे बँकेमार्फत देण्याची व्यवस्था चालू आहे. पण सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्केट यार्ड शाखे मध्ये कर्मचारी अपुरे असल्याचे सांगत उचगांव मधील जेष्ठ नागरीकांना पेन्शन उचगांव मध्ये मिळणार नसल्याचे अधिकारी सांगतात. तर आपल्या मार्केट यार्ड शाखे मार्फत सदर पुर्वी चालु असलेली जेष्ठ नागरीकांची पेन्शन वाटपाची व्यवस्था उचगांव मध्ये करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांना देण्यात आले. यावेळी उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, शरद माळी, अजित चव्हाण, सागर पाटील, रामराव पाटील, अजित कांबळे आदी उपस्थित होते.