मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाला बीसीसीआयने नकार दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असून हायब्रीड मॉडेल पद्धतीने हा सामना खेळला जाणार आहे. बीसीसीआयच्या नकारानंतर पाकिस्तानचे क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू संतापले आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक राशिद लतीफही मागे नाही.
रशीद लतीफचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अंडरवर्ल्ड किंग दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचे सांगतांना दिसत आहे. शेजारील देशातील खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत भारत सरकारने संघाला पाकिस्तानात पाठवण्यास परवानगी नाकारली तेंव्हा हा व्हिडिओ इंटरनेटवर पुन्हा चर्चेत आला आहे.
यामध्ये रशीदने दाऊदचे नाव घेऊन भारताला धमकी दिली आहे.राशिद लतीफने यूट्यूबवरील ‘कॉट बिहाइंड’ या पाकिस्तानी शोमध्ये दाऊद इब्राहिमशी असलेल्या त्याच्या जवळीकबद्दल सांगितले. दाऊद हा भारताचा मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार आहे.
या शोचे होस्ट डॉ नौमन नियाज यांच्याशी बोलताना लतीफ म्हणाला, “तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुणाशी पंगा घेत आहात, आम्ही भाईच्या घराजवळ राहतो. हे तेच शहर आहे जिथे दाऊद इब्राहिम पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संरक्षणाखाली राहत असल्याचे सांगत आहे.