हातकणंगले (प्रतिनिधी) : अतिग्रे तालुका हातकणंगले येथे डेंग्यू, चिकनगुनिया सदृश्य लक्षणे गावातील नागरिकांना आढळत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अतिग्रे ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर आणि कर्मचारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गावातील खासगी तसेच शहरातील मोठ्या रुग्णालयात नागरिक उपचार घेत आहेत.
गेल्या महिनाभरापासून वातावरणातील होणारा बदल आणि त्यातून झालेला डासांचा प्रादुर्भाव यामुळे अनेकांना ताप, थकवा, सांधेदुखी यांसारखे आजार झालेले आहेत. याबाबत अतिग्रे गावचे सरपंच सुशांत वड्ड म्हणाले, नागरिकांनी वैयक्तिक खबरदारी घेण्याबरोबरच आपण राहत्या घराभोवती स्वच्छ्ता ठेवणे गरजेचे आहे. खर्चासाठी साठवून ठेवलेले पाणी वेळेवर बदलले नाही तर डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या डासांचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच फ्रीज मधील खराब झालेले पाणी वेळेवर बाहेर काढणे, घराशेजारी जुन्या टायर मध्ये पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून औषध उपचार घ्यावेत असे आवाहन करून 100 डेज TB मुक्त अभियान 24 मार्च 2025 पर्यंत राबविले जाणार आहे. आरोग्य कर्मचारी, आशासेविका, आरोग्य सेवक, सेविका या घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. त्यातून संशयित रुग्णावर थुंकी, रक्ताचे नमुने तपासणे, एक्सरे काढणे तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून CYTB टेस्ट करण्यात येणार आहे. गावातील अनेक गटारी सांडपाण्याची व्यवस्था दर्जेदार नसल्यामुळे तुंबलेल्या आहेत. त्या साफ करून साथीचे रोग वाढणार नाहीत याची खबरदारी ग्रामपंचायतीने घेणे गरजेचे आहे.