कळे प्रतिनिधी : पणोरे ( ता.पन्हाळा ) येथील गट.क्र.272 मधील मुलकीपड जमीनीची जागा प्राथमिक शाळेला मिळावी. अन्यथा कोल्हापूर-कळे-गगनबावडा महा मार्गावरती विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात येईल. अशी मागणी पणोरे ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, विद्यामंदिर पणोरे शाळेत इ.पहिली ते सातवी.मध्ये 184 विद्यार्थी शिकत असून शाळेची इमारत पूर्णतः मोडकळीस आली आहे. खासगी जागेत नवीन इमारत बांधकाम व दुरूस्ती करण्यास जमीन मालक अडचणी आणत आहे. प्राथमिक शाळेस गट.क्र.मधील मुलकी पड जमीनीच्या जागेचा प्रस्ताव तयार केलेला असून गेली चार महिने जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. आजपर्यत कोणतीही त्यावरती कार्यवाही झालेली नाही.

गेली 20 वर्षे अनेक आंदोलने व प्रस्ताव दाखल करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. हा निर्णय 11 ऑगस्ट 2024 पूर्वी न झाल्यास सर्व पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ शाळेस कुलूप लावून कोल्हापूर-कळे-गगनबावडा या महा मार्गावरती 12 ऑगस्ट 2024 रोजी. कळे ( ता.पन्हाळा ) या ठिकाणी विद्यार्थ्यांची शाळा भरविणार आहेत. यामुळे उद्धभवणाऱ्या परिस्थितीला पूर्णत: प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. 

या संदर्भात उपजिल्हाधिकारी, पन्हाळा तहसील कार्यालय, गटाविकास कार्यालय यांना निवेदनाची प्रत देण्यात आलेली आहे.

यावेळी सरपंच मारूती पाटील, उपसरपंच प्रविण कांबळे, शा.व्य.समिती अध्यक्ष नवनाथ सुतार, दत्तात्रय चौगले, तानाजी मसुरकर, निलेश पाटील, कृष्णात कदम, यशवंत गुरव, गोरख कांबळे, लहू पाटील, भगवान पाटील, राजेंद्र पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.