कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे देशातील सर्वच उद्योगधंदे, सरकारी कामकाज ठप्प होते. यामुळे अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे ३ महिन्याचे पगार रखडले आहेत. त्यामुळे एसटी कामगारांचे ३ महिन्यांचे पगार जर ७ ऑक्टोबरपर्यंत दिले नाहीत, तर महाराष्ट्रभर विभागीय कार्यालयाच्या दारात आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे. याबाबतची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली.

कोविड-१९ च्या महामारीत एसटी कामगार जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. अशा वेळी ३ महीने वेतन मिळत नाही. महाराष्ट्रातील एसटी कामगारांचा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या ३ महिन्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे कर्मचारी हवालदील झाले आहेत. सध्या एसटी महामंडळाची आर्थिक अवस्था दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाने आर्थिक हातभार लावल्याशिवाय एसटी कामगारांचे पगार मिळणार नाही. त्यासाठी एसटी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी अनेक मंत्र्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहेत. तरीसुद्धा अजून पगार झालेले नाहीत.  

मागील ३ महिने पगार नसल्यामुळे एसटीमधील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर  भाजी विकण्याची वेळ आली आहे, असे मत विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. उपासमारीमुळे तर काहीजण टोकाचे पाऊल उचलत आहेत. कोरोनाच्या या काळात जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या कामगारांना शासनाने विमा कवच जाहीर केले आहे. पण या विम्यासाठी जाचक अटी आणि शर्ती लादण्यात आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातून फक्त ४६ कामगारांनी विम्यासाठी मागणी केली आहे. त्यापैकी फक्त ६ जणांनाच याचा लाभ झालेला दिसतो.

वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक असताना, निधी नसल्याचे कारण सांगून राज्यसरकारकडून मदत मागितली आहे, परंतु या वेतनासाठी ती ही मिळेनाशी झालेली आहे. याबाबत संघटननेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री तसेच प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. तसेच प्रत्यक्ष भेटून विनंतीही केली आहे. तरीसुद्धा पगार मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जर येत्या ७ तारखेपर्यंत गेल्या ३ महिन्यांचे प्रलंबित वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्यावतीने विभागाचे पदाधिकारी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली आहे.