जोतिबा (प्रतिनिधी) : जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज रविवार दि.१८ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी तीन पाकळी सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. तसेच आदिमाता श्री चोपडाई देवीची अलंकारिक सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली.

केदार विजय ग्रंथावर आधारीत माहीत अशी आहे की, या नवरात्र सोहळ्याला पौराणिक आणि आध्यात्मिक असे विशेष महत्त्व आहे. जोतिबाचा भैरव भक्त कमळ भैरवाने जोतिबा देवाला सुवर्ण कमळानेच पूजा करण्याचा नवस का केला? असा प्रश्न श्री जोतिबा देवाने कमळ भैरवाला केला, त्यावर कमळ भैरव जोतिबांची स्तुती करून म्हणाला, हे देवादीदेवा पूर्णब्रह्म सनातन, त्रिगुणात्मक आहात, दक्षिणाधिश आहात, कोणत्याही देवाला दक्षिण दिशा अंकित करता आली नाही. ती आपण जिंकलीत एवढेच नव्हे काळ, यम, वैविधी यांना अंकित ठेवले म्हणून येथे शनी सुद्धा नतमस्तक पश्चिमाभिमुख आहे. हे आपण मुक्तीदाता असल्याचे लक्षण आहे. मनुष्य जीवनाचा उद्धार करून भाविकाला मुक्ती देऊन त्याची इच्छा पूर्ण करता आणि भाविकाला पूर्णफळ प्राप्तीचा आनंद देता.

कमळ हे मनुष्य जीवनाचे प्रतीक आहे , म्हणून मी कामळाचेच फूल निवडले. प्रत्येकाने मिळालेल्या जीवनाचे सोने करावे त्यानेच आयुष्याचे सार्थक होते. सोने हे प्रत्येक कसोटीला सामोरे जाणारे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने आयुष्यात येणारे आव्हान स्वीकारावे, प्रत्येक क्षेत्रात यश मिळवावे, ही क्षेत्रे म्हणजेच या सुवर्ण कमळातील एक एक पाकळी होय. म्हणूनच नवरात्र उत्सवातील प्रत्येक दिवशी सोहन कमळ पुष्प पूजेतील एक एक पाकळी वाढवली जाते असे सुवर्ण कमळ पूजेचे महत्त्व आहे.

दख्खनचा राजा श्री जोतिबा यांची पूजा, पुजारी श्री महादेव झुगर (गावकर), प्रकाश सांगळे, दगडू भंडारी, गजानन लादे, यांनी साकारली. आदिमाता श्री चोपडाई देवीची अलंकारिक महापूजा पुजारी श्री सचिन ठाकरे, सुरज ठाकरे, सुमित लादे, यांनी साकारली.