कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी, कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०-२१ च्या मंजूर वार्षिक आराखड्यामधील विविध प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारपासून (दि.४) करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

या कार्यक्रमातर्गंत जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद खातेप्रमुख व जिल्हा स्तरावरील राज्य शासनाचे विविध विभागाचे विभागप्रमुख, तालुकास्तरीय छाननी समिती सदस्य, प्रभारी अधिकारी (विस्तार अधिकारी), पर्यवेक्षिका, सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी, गणातील सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्तरीय संसाधन गटाचे सर्व सदस्य व सर्व विभागांचे (जि.प व राज्य शासन) ग्राम स्तरावरील सर्व कर्मचारी, गणातील सर्व ग्रामपंचायतमधील स्वयंसहाव्यता गटांच्या ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष, अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य आणि समुह संसाधन व्यक्ती आदींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमापैकी प्रभारी अधिकारी (विस्तार अधिकारी) यांचे प्रशिक्षण कार्यक्रम दि. ४ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत तसेच पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण कार्यक्रम दि. ९ ते १२ नोव्हेंबर या दरम्यान ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आला आहे.