कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड नगरपालिकेने विकसित भारत संकल्प यात्रेचे पालिका चौकात आयोजन केले होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी विविध कक्ष उभारण्यात आले होते. या योजनांची माहिती घेण्यासाठी तसेच लाभ घेण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. दरम्यान, काही कक्षात अधिकारी, कर्मचारी नसल्याने लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरीकांनी संताप व्यक्त करत होते.

शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना लाभ मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा अभियान सुरू केले आहे. नगरपालिकेच्या वतीने पालिका चौकात हे अभियान राबविण्यात आले. आज (शुक्रवार) मुख्याधिकारी आशिष चौहान, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते या अभिनाचे सुरुवात करण्यात आली.

यामध्ये पीएम सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, घरकूल आवास, उज्वला गॅस योजना, आयुष्यमान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक कर्ज योजना, रेशनकार्ड, आरोग्य सुविधा आदी योजनांची माहिती व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विविध कक्ष उभारण्यात आले होते. तसेच आपल्या विभागात कक्ष अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून नागरीकांना मार्गदर्शन केले. विविध योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.