कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात मार्गक्रमण करत असून, शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसैनिक करत आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकांना न्याय देण्यात येत आहे. या उल्लेखनीय कार्याचे कौतुक राज्यभरातून होत आहे. आगामी निवडणुका शिवसेना संपूर्ण ताकतीने लढविणार असून, त्याकरिता कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, या महिनाभर शहरात मेळावे, शाखा बांधणी, विभागीय संपर्क कार्यालय उद्घाटने याद्वारे भगवे वादळ घोंगावणार आहे. याकरिता शिवसेनेमार्फत दि. 25 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत “दशमी शिवसंवादाची.. विजयाच्या निश्चयाची” आणि दि. 5 ते 20 ऑगस्ट पर्यंत “निर्धार शिवसैनिकांचा.. पंधरवडा शिवसंपर्काचा” या अभियानाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

यामध्ये पुढे म्हंटले आहे कि, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात झपाट्याने विकास कामे होत आहेत, लोकहिताचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे जनतेचे पाठबळ आपल्या पाठीशी आहे. केलेल्या कामांवर शिवसेना निवडणुकीस सामोरे जाणार आहे. कुठली जागा, कोण लढविणार, उमेदवार कोण यासारख्या अफवांकडे दुर्लक्ष करून शिवसैनिकांनी सर्वच मतदारसंघात कामाला लागावे. आगामी तीन महिने रात्रदिवस काम करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे.

25 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 दरम्यान शहरात “दशमी शिवसंवादाची.. विजयाच्या निश्चयाची” हे अभियान पार पडणार आहे. या अभियानांतर्गत शहरात 15 विभागवार मेळावे पार पडणार आहेत. याद्वारे प्रत्येक विभागातील शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि 5. ते 20 ऑगस्ट 2024 दरम्यान “निर्धार शिवसैनिकांचा.. पंधरवडा शिवसंपर्काचा” हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये शहरातील प्रमुख चौकात शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासह नागरिकांच्या संपर्कासाठी 6 ठिकाणी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. यासह शहराच्या सर्वच प्रवेश मार्गांवर शिवसेनेच्यावतीने करवीर नगरीमध्ये सहर्ष स्वागत करणाऱ्या फलकांचे अनावरण केले जाणार आहे. ही दोन्ही अभियाने यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असेही राजेश क्षीरसागर यांनी पत्रकात म्हंटले आहे.