कोल्हापूर : कोल्हापुरातील दुधगंगा डावा कालवा येथील कामांस प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. आता या कामाबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबद्दल अमल महाडिक यांनी समाधान व्यक्त केले.

दुधगंगा डावा कालवा कि. मी. 1 ते कि.मी. 15 मध्ये यांत्रिकी पध्दतीने आस्तरिकरण व बांधकामे दुरूस्ती करणेसाठी 55 कोटी 79 लाख रुपये. तसेच दुधगंगा डावा कालवा कि.मी. 47 ते कि.मी. 76 मध्ये यांत्रिकी पध्दतीने आस्तरिकरण करणे यासाठी 120 कोटींच्या निधीची मागणी अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही सुरू करण्याचे तात्काळ आदेश उपमुख्यमंत्र्यानी दिले होते, त्यानुसार कार्यवाहीस सुरुवात झालेली आहे.

नुकतेच राज्याचे अवर सचिव यांनी कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे याना सदर मागणीवर कार्यवाही करून अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 120 कोटींच्या मागणीचा प्रस्तावही शासनास सादर झालेला आहे. उर्वरित कामाचा अहवालही लवकरच शासनास सादर होईल, असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला.

त्यासोबतच सन 2021 साली दुधगंगा कालवे क्रमांक 1 च्या किमी.32 ते 76 मधील माती काम अस्तरीकरण व बांधकामे या कामासाठी 122 कोटी रुपयांची निविदा मे.पी.व्ही.व्यंकरेड्डी व मे.अविनाश कंस्ट्रक्शन यांना मंजूर करण्यात आली होती. या निविदेतील कामापैकी अद्याप 30 ते 40 टक्के काम अपूर्ण असताना मार्च 2024 पासून हे काम बंद आहे. त्यामुळे ते काम पूर्ण करण्यासाठीचे आदेश संबंधितांना व्हावेत, अशी विनंतीही अमल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.