कोल्हापूर(प्रतिनिधी) : नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी अंतर्गत हातकणंगले व शिरोळ कार्यालयामार्फत नवीन दोन चाकी नोंदणी मालिकेचे 4 ऑक्टोबर पासून कामकाज सुरु करण्यात येत आहे.नवीन दोन चाकी पसंती क्रमांकाचे अर्ज 4 ते 8 ऑक्टोबर सकाळी 9.45 ते 2 या वेळेत कार्यालयात स्वीकारण्यात येतील.

वाहनधारकांनी वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावयाचे आहे-

पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातीलच असणे आवश्यक आहे.पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा डिमांड ड्राफ्ट जोडलेला असणे आवश्यक आहे.धनादेश किंवा पेऑर्डर स्वीकारला जाणार नाही, असे अर्ज बाद समजण्यात येतील.डिमांड ड्राफ्ट काढताना या नावानेच काढलेला असावा.इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहिलेला असणे आवश्यक असेल.

नवीन दोन चाकी तसेच चार चाकी वाहनांच्या पसंती क्रमांकाबाबत 4 ते 8 ऑक्टोबर सकाळी 9.45 ते 2 या वेळेत अर्जासोबत मूळ रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट सादर करावा.8 ऑक्टोबर पाच वाजल्यानंतर पसंती क्रमाकांच्या व याद्या प्रसिद्ध केल्या जातील.ज्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाले असतील अशा नोंदणी क्रमांकाचा लिलाव 9 ऑक्टोबर करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने जादा रकमेचा एकच स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते 3 या कालावधीत कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.लिलावासाठी फक्त अर्जदार प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

लिलावासाठी येताना अर्जदाराने आपले ओळखपत्र व प्राधिकृत प्रतिनिधी यांच्याकडे प्राधिकारपत्र व स्वतःचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.आकर्षक नोंदणी क्रमांक घेतलेल्या तारखे पासून सहा महिन्याच्या आत वाहन नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे.आकर्षक क्रमांकाच्या नियमीत पावत्या 10 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येतील.जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल, असेही इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.