कुरुंदवाड प्रतिनिधी :- कुरुंदवाड नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ७ मधील मतदार, अमित चंद्रकांत पाटील यांनी गेल्या २५ वर्षांपासूनच्या निवडणुकीच्या अनुभवावरून एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी हा त्याच वार्डातला आणि गल्लीतील असणे अत्यंत आवश्यक आहे, तरच वार्डाचा सर्वसमावेशक विकास साधता येईल.
पाटील यांनी स्पष्ट केले की, निवडणूक म्हणजे मतदारांनी पाच वर्षांसाठी आपला लोकप्रतिनिधी निवडणे, ज्याची मुख्य जबाबदारी वार्डातील सामाजिक समस्या, आरोग्य, पाणी, रस्ते, वीज, गटारे, परिसर स्वच्छता, आणि धार्मिक स्थळांची काळजी घेणे ही असते. तसेच, दर तीन महिन्यांनी वार्ड सभा घेणे आणि वार्डातील लोकांच्या सुख-दुःखात सामील होणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या २५ वर्षांपासून त्यांच्या वार्डातील नगरसेवक इतर भागातून निवडून येत असल्यामुळे, विकासाच्या कामांमध्ये आणि नागरिकांशी थेट संबंध ठेवण्यात अडचणी येत आहेत, असा त्यांचा अनुभव आहे.
गेली २५ वर्षे वार्ड दोन भागांमध्ये विभागलेला होता, पण आता तो संयुक्त होऊन एकच वार्ड बनला आहे. या नव्या रचनेमुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
अमित पाटील म्हणाले, या वार्डामध्ये सर्व समाजाचे लोक एकत्र राहतात. शिवजयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, हनुमान जयंती उत्सव, मोहरम, ईद-ए-मिलाद, रमजानचे उपवास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे जयंती/पुण्यतिथी सारखे महापुरुषांचे कार्यक्रम देखील सर्व समाज मिळून एकत्रितपणे साजरे करतो. या सामाजिक एकोप्यामुळे लोकप्रतिनिधीने देखील सर्वसमावेशक भूमिका घेणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर, अमित पाटील यांनी सर्व गट, तट, पक्ष आणि संघटनांना कळकळीची विनंती केली आहे की, त्यांनी वार्ड क्रमांक ७ मधून उभ्या राहणाऱ्या उमेदवाराचा विचार करताना, तो त्याच भागातील आणि वार्डातील असावा या मागणीचा आदर करावा. तरच लोकांच्या समस्या मुळापासून सोडवता येतील आणि वार्डाचा अपेक्षित विकास साधता येईल.
