टोप ( प्रतिनिधी ) पुणे बंगळुरू महामार्ग ओलांडत असताना अंबप फाटा येथे भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गणेश अनिल निकम (वय -23, हा युवक ठार तर त्याचा लहान भाऊ वैभव अनिल निकम (वय 21 रा.सहारा चौक, पेठवडगांव ) हा गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे बंगळुरू महामार्गावर अंबप फाट्याजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सहारा चौकात राहणारे गणेश व वैभव निकम हे दोघे बंधू अंबप फाट्याजवळ कंपनीत काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी ते कामासाठी जात होते.

दरम्यान महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यातून धोकादायक महामार्ग ओलांडत असताना कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या मोटरसायकल (एमएच 10 बीडब्ल्यु 4620 ) ला जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील दोघेही फरफडत गेले.

यात गणेश याच्या डोक्याला जबरी मार लागला तर  तर वैभव यालाही बऱ्याच ठिकाणी मार लागण्याबरोबरच पाय फ्रॅक्चर झाला. या दोघांना गंभीर अवस्थेत 108 रुग्णवाहिकेतुन प्राथमिक उपचार देत डॉ.वैभव कुंभार यांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण गणेश याला रुग्णालयात  दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. चारचाकी वाहनामधील महिला रोणीता अहुजा, अनमोल डिक्वेस्टा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णाशी उपचार सुरू आहेत.