कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात संवाद नवा अनुभवाशी या उपक्रमात बारावे पुष्प गुंफताना दोन वेळा चित्रपट निर्मितीसाठी फिल्मफेअर व एकदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे सचिन सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय जीवनात एका कवीतेत प्रतिप्रश्न विचारल्यानंतर मिळालेला मार, ते कुटुंबातील लोकांच्या अपेक्षांचे ओझे यातून होणारी घुसमट, या मधल्या कुचंबना वर्गातील आपला जीवन प्रवास त्यांनी श्रोत्यांसमोर उलगडला.

कोल्हापूर व फुटबॉल यांचे नाते संपूर्ण जगासमोर मांडताना आलेले रोमांचक सत्य ,सॉकर सिटी या चित्रपटातून कसे उलगडले ,तटपुंजे पैसे व साहित्याची कमतरता असताना सुद्धा हा पिक्चर कसा तयार केला याचे सुंदर कथन केले.कोल्हापूरच्या मर्दानी खेळांचा इतिहास वारसा चित्रपटाद्वारे जगासमोर मांडताना त्यातील कसब, कौशल्ये ,निष्ठा,खेळाडूंनी कसे जपले यांचे कथनकरत शिवाजी महाराजांच्या प्राचीन युद्ध कलेचा इतिहास जपण्यासाठी ही कला अभ्यासक्रमात समाविष्ट झाली पाहिजे असा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे असे प्रतिपादन केले.

रवींद्रमेस्त्रीच्या कॅमेरा पासून ते उद्यमनगरीतील कारागिरापर्यंतजे द्यावे ते उत्तम द्यावे हे कोल्हापूरकरांच्याकडून शिकण्यासारखे आहे हे नमूद केले. प्रेक्षकांच्या प्रश्नोत्तराच्या कालावधीत आपल्या विवाहाच्या खुमासदार गोष्टी पासून येऊ घातलेल्या चित्रपटांच्या पर्यंत, अत्यंत ओघवत्या शैलीत सर्वच विषय सुंदर रित्या मांडले.अत्यंत मिश्किल प्रश्न विचारत अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कार्यक्रमात रंगत आणली. सूत्रसंचालन योगेश चिकोडे यांनी केले तर वक्त्यांचा परिचय जयदीप मोरे यांनी करून दिला.

यावेळी राजकुमार पाटील, प्रा. अशोक कोरडे, किरण अतिग्रे, चंद्रकांत चव्हाण यांनी प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे नियोजन सचिन साळोखे, आशिष बामणे, विवेक कुलकर्णी, मधुरिमा चिकोडे, प्रथमेश पिष्टे, ओंकार सुतार यांनी केले.